करून दाखवलं : सरकारच्या नाकावर टिच्चून अहिल्यादेवींच्या स्मारकाचं पडळकरांनी केले मेंढपाळांच्या हस्ते उद्घाटन

सांगली – सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला आहे. खासदार शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. आता पडळकर यांच्यासोबत माजी  सदाभाऊ खोतही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहेत.

मेंढपाळाच्या हस्तेच लोकार्पण सोहळा व्हायला हवा, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली असून धनगर समाजाचा देखील पडळकर याना पाठींबा मिळताना दिसत आहे. दरम्यान,कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणं शक्य नसल्याचं पाहायला मिळत होतं. अशावेळी गनिमीकाव्याने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय.

पाच मेंढपाळांच्या हस्ते या लोकार्पण केले जावे, अशी त्यांनी मागणी लावून धरली होती व त्यानुसार लोकार्पणासाठी ते पुतळ्याकडे जात असताना त्यांना पोलिसांनी मल्हारराव चौकात रोखून धरल्याने बराचवेळ गोंधळ सुरू होता. अखेर आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली असल्याचे सांगत, पडळकर यांनी लोकार्पण झाले असल्याची माहिती माध्यमांना दिली. यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून व झेंडे फडकावून आनंदोत्सव साजरा केला. शिवाय, घोषणाबाजी देखील करण्यात आली.