साऊथ इंडस्ट्रीत खळबळ; ‘पुष्पा’ सिनेमाच्या निर्मात्यांच्या घरावर, कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

केरळ| ‘पुष्पा- द राईज’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या घर आणि ऑफिससह 15 ठिकाणी केरळ व तमिळनाडूच्या आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या मैत्री कंपनीच्या मालकासह त्यांच्याशी संबंधित इतरांवरही आयटी विभागाने छापे टाकले आहेत. या कंपनीने पुष्पा, रंगस्थलम, श्रीमंथुडू सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवले आहेत.

मैत्री या तेलुगू चित्रपट निर्मिती कंपनीच्या अनेक ठिकाणी आयकर विभागाने सोमवारी छापे टाकले. काही अनिवासी भारतीयांनीही या उत्पादन कंपनीत गुंतवणूक केल्याचा आयकर विभागाला संशय आहे. या संशयाच्या आधारे प्राप्तिकर विभागाने कंपनीचे तीन मालक यलमांचिली रविशंकर, नवीन अर्नेनी आणि चेरुकुरी मोहन यांच्या निवासस्थानांसह 15 ठिकाणी छापे टाकले. तसेच प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन याच्या घरीही छापेमारी झाली. इतर नामांकित निर्माते अँटनी पेरुंबवुर, अँटो जोसेफ आणि लिस्टिन स्टीफन यांच्याही घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या मोठ्या निर्मिती कंपन्यांनी करचुकवेगिरी केली का, याचा तपास आयकर विभागाचे अधिकारी करत आहेत. पृथ्वीराज सुकुमारन, मोहनलाल, ममूटी ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठी नावं आहेत. त्यामुळे या कारवाईची विशेष चर्चा होत आहे.