‘कसोटी क्रिकेटचा बादशहा’ बनला भारत! ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी विराजमान

नवी दिल्ली- बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) सहा गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतही 2-0 अशी अजेय आघाडी घेतली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळाच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतासमोर विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य होते, जे यजमानांनी चार गडी गमावून पूर्ण केले. या विजयाचा अर्थ टीम इंडियाने सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्याजवळ राखण्यात यश मिळवले आहे. या शानदार विजयामुळे टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीतही अव्वल ठरली आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू केली तेव्हा त्यांच्या खात्यात 115 गुण होते आणि ते आयसीसी क्रमवारीत (ICC Test Ranking) दुसऱ्या स्थानावर होते. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया 126 गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान होता. नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतरही भारतीय संघाच्या क्रमवारीवर कोणताही परिणाम झाला नसून दोन्ही संघांमधील अंतर मात्र कमी झाले आहे. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या खात्यात 120 गुण जमा झाले होते आणि ऑस्ट्रेलिया 122 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम होता.

दिल्ली कसोटीत भारताच्या दणदणीत विजयाने या परिस्थितीत मोठा बदल घडवून आणला. कसोटी क्रिकेटचा सम्राट बनल्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाचा दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर धुव्वा उडवून भारतीय संघाने सिंहासन हिसकावून घेतले. मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवून भारतीय संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम मिळवले आहे. या विजयासह भारताच्या खात्यात १२१ गुण जमा झाले तर ऑस्ट्रेलिया १२० गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. मात्र आयसीसीने अद्याप आपली कसोटी क्रमवारी अपडेट केलेली नाही, पण क्रमवारीच्या अंदाजानुसार भारत नंबर १ कसोटी संघ बनला आहे.