“नुसतं लोकसंख्या वाढवून उपयोग नाही तर गुणवत्ताही…”; चीनचा भारताला टोला

लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या (Worlds Most Population Country) असलेला देश बनला आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी झाली आहे. भारताची लोकसंख्या आता चीनपेक्षा २९ लाखांनी वाढली आहे. १९५०नंतर पहिल्यांदाच भारताच्या लोकसंख्येने चीनला मागे टाकले आहे. मात्र यावरुनच आता चीनचा संताप होत असल्याचं कळत आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताचं नाव न घेता टीका केली आहे. लोकसंख्या वाढवून फायदा नाही, त्यामध्ये गुणवत्ताही असायला हवी, अशी टीका चीनने केली आहे. अजूनही आपल्याकडे असलेलं ९० कोटी मनुष्यबळ हे चीनच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यास सक्षम आहे, असं चीनने म्हटलं आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेंग वेनबिग याबद्दल बोलताना म्हणाले, “मी तुम्हाला सांगू इच्छितो की, फक्त लोकसंख्या वाढून उपयोग नाही तर गुणवत्ताही महत्त्वाची आहे. लोकसंख्येसोबत प्रतिभा असणंही महत्त्वाचं आहे. चीनची लोकसंख्या १.४ बिलियनपेक्षा जास्त आहे. पण कार्यरत असणाऱे लोक ९०० मिलियनच्या आसपास आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठीही चीन प्रयत्न करत आहे.”