जय हो! कोहलीची धडाकेबाज खेळी, भारताने ४ विकेट्सने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ

INDvsPAK: रविवारी मेलबर्नच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs pakistan) संघात टी२० विश्वचषक २०२२ मधील (T20 World Cup 2022) सर्वात रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली होती. परंतु रनमशीन म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहली याने भारतीय संघाची लाज आणि सामना दोन्हीही वाचवले. तडाखेबंद फलंदाजी करत त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली.

प्रथम फलंदाजी करताना शान मसूद आणि इफ्तिकार अहमद यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. त्यांनी निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा फलकावर लावल्या. शान मसूदने सुरुवातीला मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत ४२ चेंडूत नाबाद ५२ धावांची चिवट झुंज दिली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार मारले. तसेच इफ्तिकार अहमदने ३४ चेंडूत ४ षटकार व २ चौकारांच्या मदतीने ५१ धावा फटकावल्या. इतर फलंदाजांना साध्या २० धावाही करता आल्या नाहीत.

प्रत्युत्तरात भारतीय संघाला पावरप्लेमध्ये एकानंतर एक झटके बसले. चार षटकातच केएल राहुल (०४ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (०४ धावा) स्वस्तात बाद झाले. सूर्यकुमार यादवही धडाकेबाज खेळीनंतर १५ धावांवर बाद झाला. तर अक्षर पटेल २ धावांवर धावबाद झाला. मात्र विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी संघाला उपयुक्त भागीदारी रचून दिली. विराट आणि हार्दिकमध्ये पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी झाली. हार्दिक ४० धावांवर बाद झाला.

विराटने मात्र शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने डावाखेर ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ४ खणखणीत षटकार व ६ चौकार ठोकले. त्याच्या या मॅच विनिंग खेळीमुळे भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि विजयी पताका झळकावली. भारताने ४ विकेट्सने हा सामना जिंकला.