भारतीय क्रिकेटरची तब्बल ७१ लाखांची फसवणूक, आता कुटुंबासह जीवे मारण्याची धमकीही मिळाली

भारताचा देशांतर्गत क्रिकेटपटू रविकांत शुक्ला (Ravikant Shukla) सध्या फसवणुकीचा बळी ठरला आहे. त्याच्यासोबत सुमारे ७१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल, IPL) मधील पंजाब किंग्ज संघाचा सदस्य राहिलेल्या रविकांत शुक्लाने (Indian Cricketer Ravikant Shukla) यजदान बिल्डरविरोधात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. रविकांत शुक्लापूर्वी भारतीय गोलंदाज उमेश यादवही फसवणुकीचा शिकार बनला होता.

रविकांत शुक्लासह परिवाराला जीवे मारण्याची धमकी
क्रिकेटपटू रविकांत शुक्ला याने हजरतगंज पोलिस ठाण्यात यजदान बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (Ravikant Shukla Fraud) दाखल केला आहे. यजदान बिल्डरने एलडीएच्या नियमानुसार अपार्टमेंट बांधल्याचा आरोप त्याने तक्रारीत केला आहे. मात्र नंतर हे अपार्टमेंट बेकायदा जमिनीवर बांधल्याचे निष्पन्न झाले. यामुळेच एलडीएने डिसेंबरमध्ये अपार्टमेंट बेकायदेशीर ठरवून पाडले. आता क्रिकेटपटू रविकांत शुक्ला यजदान बिल्डरकडून त्याचे ७१ लाख रुपये परत मागत आहे. त्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबासह जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. क्रिकेटपटूने याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

रविकांतने दोन फ्लॅट बुक केले होते
३५ वर्षीय रविकांत हा मूळचा उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील रहिवासी आहे. हजरतगंजचे प्रभारी निरीक्षक अखिलेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविकांत सध्या लखनऊमधील हजरतगंजमधील डालीबाग भागातील बटलर रोडवरील केके अपार्टमेंटमध्ये राहतो.

त्याने हजरतगंज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत लिहिलेय की, यजदान बिल्डरच्या प्राग नारायण रोड अलया हेरिटेज अपार्टमेंटमध्ये त्याने दोन फ्लॅट बुक केले होते. ७ जणांनी आपली फसवणूक करून ७१ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप रविकांतने केला आहे.

रविकांत शुक्लाची क्रिकेट कारकिर्द
रविकांत शुक्लाला आयपीएल २००९च्या हंगामात पंजाब संघाने विकत घेतले होते. तरीही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघाकडूनही तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही. परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी प्रशंसनीय राहिली आहे. त्याने ४० प्रथम श्रेणी सामने खेळताना १९६२ धावा केल्या आहेत. तसेच ३७ अ दर्जाच्या सामन्यात ९१६ धावा आणि १५ टी२० सामन्यात २४५ धावा केल्या आहेत.