IPL Playoffs Schedule: आयपीएल प्लेऑफचे वेळापत्रक ठरले, पाहा कोणता संघ कोणाशी भिडणार?

IPL Playoffs Schedule: आयपीएलच्या 16व्या हंगामातील साखळी फेरीचे सामने संपले. 70 सामन्यांनंतर प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) पराभव केला. या पराभवानंतर आरसीबी संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यांचे प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आरसीबीच्या पराभवाचा फायदा घेत अंतिम-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

आरसीबीच्या विजयाने मुंबई प्लेऑफमध्ये कशी पोहोचली?
रविवारी (21 मे) गुजरात आणि आरसीबी यांच्यातील सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर मुंबईने विजय मिळवला. हा त्यांचा स्पर्धेतील आठवा विजय होता. या विजयासह मुंबई राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीला मागे टाकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले.

जर आरसीबीने त्यांच्या अंतिम साखळी सामन्यात गुजरातला पराभूत केले असते तर त्यांना मुंबईच्या बरोबरीचे 16 गुण मिळाले असते आणि चांगल्या नेट रनरेटने प्लेऑफमध्ये पोहोचले असते. मात्र, तसे झाले नाही आणि आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या पराभवाचा फायदा मुंबईला झाला आणि त्यांनी प्लेऑफचे तिकीट मिळाले.

टॉप-4 मध्ये कोणते संघ आहेत?
गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 14 पैकी 10 सामने जिंकले. गुजरातने 20 गुणांसह पहिले स्थान मिळविले. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी प्रत्येकी आठ सामने जिंकले. दोघांमधील एक सामना रद्द झाला. अशा प्रकारे चेन्नई आणि लखनऊचे 17-17 गुण होते. चांगल्या नेट रनरेटच्या आधारे चेन्नईने दुसरे स्थान पटकावले. तर लखनऊला तिसरे स्थान मिळाले. मुंबईला आठ विजयांतून 16 गुण मिळाले. ते चौथ्या क्रमांकावर राहिले.

प्लेऑफमध्ये कोण कोणाशी स्पर्धा करत आहे?
प्लेऑफबद्दल बोलायचे झाले तर, सर्वप्रथम क्वालिफायर-1 मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. यानंतर चेन्नईतच मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. क्वालिफायर-2 हा क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ यांच्यात खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर-1 च्या विजेत्याशी अंतिम सामना खेळेल.