तयार राहा! आयपीएल २०२३चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी गुजरात अन् चेन्नई संघात होणार पहिला सामना

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल २०२३ चे वेळापत्रक जाहीर झाले (IPL 2023 Schedule Announced)आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन आज संध्याकाळी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३१ मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना गतवर्षीचे विजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात रंगणार आहे.

आयपीएल २०२३ चा सलामीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. स्पर्धेचे १६ वे सीझन ३१ मार्चपासून सुरू होईल आणि शेवटचा साखळी सामना २१ मे रोजी खेळवला जाईल. तर २८ मे रोजी आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे.

५२ दिवसांत ७० सामने रंगणार
५२ दिवसांत १० संघांमध्ये ७० लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर ४ प्लेऑफ सामने खेळवले जातील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत. यात १८ डबल हेडर असतील (एका दिवसात दोन सामने). सर्व सामने देशभरातील एकूण १२ मैदानांवर खेळवले जातील. साखळी फेरीत एक संघ आपल्या घरच्या मैदानावर ७ सामने आणि विरोधी संघाच्या मैदानावर ७ सामने खेळेल. म्हणजे ही स्पर्धा होम अॅण्ड अवे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.

या मैदानांवर होणार आयपीएलचे सामने
आयपीएल २०२३चे सामने देशभरातील एकूण १२ मैदानांवर खेळवले जातील. यामध्ये अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला यांचा समावेश आहे.