शिवजयंतीवर आक्षेप घेणाऱ्या मिटकरींना विनायक राऊत यांनी झापलं; म्हणाले…

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. आज त्यांनी यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यावर आक्षेप घेतला आहे. शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं त्यांनी म्हटलंय. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण असल्याचा जावईशोध मिटकरी यांनी लावला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी मिटकरींना चांगलंच झापलं आहे. ते म्हणाले, “अमोल मिटकरी यांना विनंती आहे की तुम्ही गोंधळ निर्माण करू नका. शासनाने जन्मतारीख शोधून काढली त्यानुसार शासन शिवजयंती साजरी करेल. पण शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी, अशी शिवप्रेमींची भावना आहे. त्याप्रमाणे ते साजरे करत आहेत. तुम्ही संभ्रम निर्माण करू नका”, असं खासदार विनायक राऊत म्हणालेत.

विनायक राऊत म्हणाले, “शिवसेना शिवजयंती तिथीनुसारच साजरी करते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही प्रथा चालू केली आणि आता देशभर, जगभर ती पाळी जाते”, असं राऊत म्हणालेत. त्यामुळे शिवजयंतीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं दिसून येतंय.