नरेंद्र मोदी देहूत जगद्गुरू श्रीसंत तुकाराम शिळा मंदिराचं करणार लोकार्पण; वारकऱ्यांना करणार संबोधित

Pune – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  आज एका दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारी पुण्याजवळच्या देहू (Dehu) इथं जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी देहूनगरीत आलेल्या हजारो वारकऱ्यांना ते संबोधित करतील.

देहू नगरीत देशाचे पंतप्रधान येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. आधी ते मुख्य मंदिराला भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्तीचं दर्शन घेतील. त्यानंतर मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या भागवत धर्माची पताका असलेल्या 61 फुटी स्तंभाचं पूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. शिळा मंदिराच्या लोकार्पणाचा मुख्य कार्यक्रम त्यानंतर होईल.

मंदिराच्या भजनी मंडपात तुकोबारायांच्या मूळ गाथेचं हस्तलिखित पंतप्रधानांना यावेळी दाखवण्यात येणार आहे. नंतर तुकोबारायांचे प्रतीक समजली जाणारी खास पगडी (Turban) आणि तुळशीची माळ देऊन मंदिर विश्वस्तांच्या हस्ते मोदी यांचा सत्कार करण्यात येईल. मंदिर परिसरातील हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदी सभास्थानी रवाना होतील.