महाराष्ट्राला “वेड्यात” काढलं जातंय; अक्षय कुमारच्या शिवछत्रपतींच्या पहिल्या लूकवर आव्हाडांची टीका

Mumbai: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने काल त्याच्या पहिल्या मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या शूटींगला सुरुवात केली आहे. त्याने या चित्रपटातील आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला लूकही शेअर केला आहे. परंतु या लूकवरून त्याला भरपूर ट्रोल केले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आहे.

आव्हाड यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे ज्यामध्ये शिवछत्रपतींची काही चित्र आहेत. ही तीन चित्र शेअर करताना आव्हाड यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमावर टीका केली.

त्यांनी असे लिहिले आहे की, ‘जर्मनी, पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं असं वाटतं.’ आव्हाड यांनी थेट अक्षय कुमारचं नाव न घेता त्याच्या लूकवर केलेली ही टिप्पणी विशेष चर्चेत आली आहे.