शॉकिंग! आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला, हत्येनंतर शरीराचे ३५ तुकडे केले अन्…

दिल्ली: दिल्ली पोलिसांनी शनिवारी (१२ नोव्हेंबर) आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला अटक केली. आफताब अमीन पूनावाला असे आरोपीचे नाव असून त्याने ६ महिन्यांखाली त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाचा गळा दाबून खून केला. या हत्या प्रकरणी आफताबला पोलिसांनी अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि करवतीने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि ते घरात ठेवले. त्यासाठी आफताबने नवीन मोठा फ्रीज विकत घेतला आणि १८ दिवस तिच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले. तो दररोज रात्री २ वाजता तिच्या शरीराचे तुकडे एक-एक करून प्लास्टिकच्या बॅगमध्ये घेऊन जायचा आणि दिल्लीतील वेगवेगळ्या जागी फेकायचा.

दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते
तब्बल सहा महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली आहे. श्रद्धा असे मृत तरुणीचे नाव आहे. २६ वर्षीय श्रद्धा मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती, जिथे तिची पूनावालाशी भेट झाली. दोघांनी डेटिंग सुरू केली आणि ती आफताबसोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागले. परंतु, श्रद्धाचे कुटुंबीय त्यांच्या नात्यावर नाराज होते, त्यामुळे दोघेही मुंबई सोडून दिल्लीत आले व मेहरौली येथे भाड्याच्या घरात राहू लागले.

श्रद्धाचे वडील तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्यावर नजर ठेवत. परंतु बरेच दिवस तिच्या सोशल मीडियावर कोणतीही अपडेट न आल्याने वडिलांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवत श्रद्धाचे वडील विकास मदन आपल्या मुलीला पाहण्यासाठी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत आले होते. ते तिच्या फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा फ्लॅटला कुलूप होते. त्यानंतर त्यांनी मेहरौली पोलिसात जाऊन अपहरणाची तक्रार दाखल केली. श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

वेगवेगळ्या ठिकाणी फेकले शरीराचे तुकडे
पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा ५ महिन्यांनंतर खुलासा करत आफताबला अटक केली. तपासादरम्यान, त्याने उघड केले की, श्रद्धाला त्याच्याशी लग्न करायचे असल्याने दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. आफताबने आधी श्रद्धाची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मेहरौलीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आरोपी इतका हुशार होता की, दुर्गंधी कमी करण्यासाठी तो मृतदेह मोठ्या फ्रीजमध्ये ठेवत असे. तो हे तुकडे रात्रीच्या अंधारात फेकायचा जेणेकरून जंगली प्राणी आणि कीटक ते खातील.