“हा रामभक्तांचा अपमान आहे…”, जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावर प्रचंड संपातले देवेंद्र फडणवीस

मुंबई- रामनवमीच्या (Ramnavami) दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती (Hanuman Jayanti) राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे. शुक्रवारी (२१ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात ते बोलत होते. ईदच्या दिवशी हे वक्तव्य केल्याने त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले आहे.

“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे. खरं तर येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल कारण सत्ताधारी देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्याकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही”, असे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस संतापले
यावर आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया पुढे आली असून त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर संताप व्यक्त केला आहे. “जितेंद्र आव्हाडांचे विधान आक्षेपार्ह आहे. रामनवमी असो किंवा हनुमान जयंती असो,अत्यंत शांततेने साजरी केली जाते. लोकांच्या मनामध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रती आणि हनुमानांच्या प्रती प्रचंड श्रद्धा आहे. ती श्रद्धा त्यानिमित्त व्यक्त केली जाते”, असे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले.

“दंगलीकरीता रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हणणे हा समस्त समाजाचा आणि रामभक्तांचा अपमान आहे. महाराष्ट्रात भविष्यात दंगली घडतील, असे वक्तव्य करणे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? तुम्ही काही ठरवलं आहे का? दंडली घडवायच्या असा त्याचा अर्थ आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य चुकीचे आहे. अशा प्रकरणांमध्ये संवेदनशील वागले पाहिजे, संवेदनशील बोलले पाहिजे, सनसनाटी बोललं पाहिजे असे काही गरजेचे नाहीये”, असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांना दिला.