सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार मग अब तेरा क्या होगा कालिया… ? 

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरण (Mansukh Hiren murder case)  आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात (Antilia Blast Case) कोठडीत असणार्‍या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा (Sachin Waze) माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. सचिन वाझेने (Sachin Vaze) १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला अटी-शर्तींसह मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांच्या वतीने संबंधित अर्जाला विरोध करण्यात आला. पण शिंदे यांच्या अर्जावर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. एक आरोपी दुसऱ्या आरोपीच्या माफीचा साक्षीदार होण्यावर आक्षेप घेऊ शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya)  यांनी परिवहनमंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता अनिल परब आणि उद्धव ठाकरेंची झोप उडाली असेल असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे. मला हिंदी सिनेमाचा डायलॉग आठवतो अब तेरा क्या होगा कालिया…अनिल परब यांना झोप येत नसेल आणि उद्धव ठाकरेंचीही झोप उडाली असेल. उद्धव ठाकरेंनी बेकायदेशीरपणे सचिन वाझेची नियुक्ती केली होती. सचिन वाझेकडून आलेला १०० कोटीच्या वसुलीचा पैसा अनिल परब यांच्या रिसॉर्टमध्ये गुंतवण्यात आला होता. अनिल देशमुख गेले आता अनिल परब आणि उद्धव ठाकरे तुमचं काय होणार?, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.