सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू… तुला जे करायचं ते कर;  पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई – शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Shiv Sena leader Kishori Pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचं नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे. या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde)  बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष मिळून ५० आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात असताना किशोरी पेडणेकर यांना ही धमकी आली आहे. “मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सांग”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.