मंत्री नवाब मलिकांचे समर्थनार्थ फिरताना कोल्हापूरकरांचा अपमान झाला नाही का?

कागल – मंत्री नवाब मलिकांचे समर्थनार्थ फिरताना कोल्हापूरकरांचा अपमान झाला नाही का? असा सवाल राजे समरजितसिंह घाटगे यांनी सोशल मिडीयावर प्रसारीत केलेल्या वीडीओद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला आहे.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, ग्रामविकास मंत्री असे वक्तव्य करतात की भाजपाने मोठ्या संख्येने बाहेरून लोक कोल्हापूर उत्तरच्या इलेक्शनला बोलविल्याने कोल्हापूरचा मान-सन्मान, अस्मिता डिवचणार आहे, कमी होणार आहे हा कोल्हापूरचा अपमान आहे.त्यांना माझी स्पष्ट विचारणा आहे दाऊदशी लिंक असलेल्या नवाब मलिकच्या समर्थनार्थ तुम्ही कोल्हापूरमध्ये फिरला. ज्या नवाब मलिकने हसीना पारकरला पैसे दिले. त्या पैशाचा दाऊदने वापर करून मुंबईमध्ये बाँबस्फोट केले. असंख्य निरपराध भारतीय माणसं मारली गेली. आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते आज तुरुंगात आहेत. त्याची बाजू तुम्ही घेता,दुसरी गोष्ट याच नवाब मलिकनी रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणा द्यायला नकार दिला. त्यांना घोषणा द्यायला व हात वर करायला लाज वाटत होती का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, नवाब मलिकच्या पांठिब्यासाठी मंत्री महोदय आपण कोल्हापूर शहरामध्ये फिरला.श्री शाहू महाराजांच्या कागल भूमीमध्ये तुम्ही गैबी, श्रीराम मंदिर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत नवाब मलिकच्या पाठिंब्यासाठी रॅली काढली. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचं यांच्यामध्ये कोल्हापूरकरांचा आणि कोल्हापूरचा अपमान होत नाही का ?याच्यामध्ये कोल्हापूरची अस्मिता कोल्हापूरचा मानसन्मान तुम्हाला नाही दिसत नाही का ? आम्हाला तर वाटते तुमच्या या कृतीने कोल्हापूरसह भारताचा अपमान तुम्ही केला आहे. ज्या गैबीदेव,श्रीराम मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मालिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावरून चालला या सगळ्या पावन भूमीचा तुम्ही अपमान केला आहे. मी तुम्हाला एवढेच सांगतो ज्या गोष्टी तुमच्या विचारसरणीच्या पलीकडे आहेत त्यामध्ये तुम्ही यापुढे पडू नये.