स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या जिवाला धोका! मिळाली धमकी, परिवारावरही बेधुंद गोळीबार

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi Life Threat) याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला सार्वजनिकरित्या धमक्या आल्या आहेत. गुरुवारी (2 मार्च) रात्री उशिरा दोन बंदूकधाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुकानावर अचानक हल्लादेखील केला आहे. गोळीबारात दुकानाच्या काचाही फुटल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी तेथे एक धमकीची चिठ्ठीही सोडली. ज्यामध्ये लिहिले आहे, “मेस्सी, आम्ही तुझी वाट पाहतोय.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिओनेल मेस्सीचे कुटुंब अर्जेंटिनाच्या रोजारियो येथे सुपरमार्केट चालवते. तेथे गुरुवारी रात्री दोन बंदूकधाऱ्यांनी गोळीबार करून खळबळ उडवून दिली. हल्लेखोरांनी दुकानावर 14 गोळ्या झाडल्या, ज्यामुळे दुकानासमोरील काचा फुटल्या.

रोझारियोचे महापौर पाब्लो जावाकिन यांनी हल्ल्याची पुष्टी केली. ज्या सुपरमार्केटवर हल्ला झाला ते लिओनेल मेस्सीच्या कुटुंबाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्याने हल्लेखोरांना शहरात अराजक माजवायचे होते, असे ते म्हणाले. मेस्सीसाठी बदमाशांनी सोडलेल्या चिठ्ठीत रोझारियोचे महापौर पाब्लो जावाकिन यांचे नावदेखील नमूद केले आहे. “जावाकिन तुम्हाला वाचवू शकणार नाही, कारण तो नार्को (ड्रग स्मगलर)) आहे”, असे या चिठ्ठीत लिहिले होते.

‘हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही’
प्रांतीय पोलिस सहाय्यक इव्हान गोन्झालेझ यांनी कॅडेना 3 टेलिव्हिजन स्टेशनला सांगितले की, हा हल्ला धोका नव्हता, परंतु लक्ष वेधण्याचा हेतू होता. हा हल्ला झाला तेव्हा सुपरमार्केटमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू’
या प्रकरणाचे प्रभारी अभियोक्ता फेडेरिको रेबोला यांनी पत्रकारांना सांगितले की, मेस्सीच्या कुटुंबाला याआधी कोणत्याही धमक्या आल्या नाहीत. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आणि छायाचित्रे आहेत, तपास वेगाने सुरू आहे, गुन्हेगारांना लवकरच अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. हे उल्लेखनीय आहे की रोझारियो, पराना नदीवरील बंदर शहर, हळूहळू अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनले आहे आणि 2022 मध्ये 287 खूनांसह अर्जेंटिनामधील सर्वात हिंसक शहर बनले आहे.