मराठवाडा मुक्‍ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येणार

मुंबई : मराठवाडा मुक्‍ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या (Marathwada Mukti Sangram Amritmahotsava) निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येईल. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतून उत्कृष्ट ठरणारा लोगो आणि पोस्टरची अंतिम निवड करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्‍ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाडयात शासकीय सांस्कृतिक उपक्रम आयोजित करणे तसेच सांस्कृतिक कार्य विभागातील विविध विषयांवरील बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, उपसचिव विद्या वाघमारे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या संग्रमाची माहिती सोप्या आणि सहज भाषेत लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मराठवाडा सांस्कृतिक महोत्सव मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येईल. मराठवाड्यातील स्थानिक कलाकारांना यामध्ये प्रामुख्याने समावेश असेल. याशिवाय मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास उलगडून हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष गीत तयार करण्यात येईल.

सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत यावर्षी ६ महसूली ठिकाणी विभागीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र हा महोत्सव विभागीय स्तरावर ना करता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘ महासंस्कृती महोत्सव‘ आयोजित करण्यात येईल असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.