लाल किल्ल्यावर ‘जाणता राजा’च्या प्रयोगातून बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतीला अभिवादन

दिल्ली/विनायक आंधळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या ‘जाणता राजा ‘ या महानाट्याचा प्रयोग देशाची राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर सादर करत, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींचे स्मरण चिरकाळ व्हावे, तसेच त्यांचा इतिहास घराघरांत पोहचविण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा तिथीनुसार कार्तिक एकदशी दिवशी पहिला स्मृतीदिन आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पुण्यातील महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि दिल्ली येथील दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे लाल किल्ला येथे १५० हून अधिक कलाकार, घोडे, उंट यांचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचा भव्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

तब्बल पाच दिवस चालणाऱ्या या प्रयोगादरम्यान शुक्रवारी, ४ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात बाबासाहेब यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, सर्वोच्च न्यायालयालायचे न्यायमूर्ती अभय ओक, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे उपस्थित होते.

याबाबत शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर म्हणाले ,कार्तिक एकादशी हा तिथीनुसार बाबासाहेबांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी ‘जाणता राजा’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित महानाट्याचा प्रयोग आम्ही दिल्लीतील लाल किल्ल्यावर सादर केला. त्यांच्या स्मृतीदिनी याठिकाणी हा प्रयोग सादर होत असल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे.  या प्रयोगाचे संयोजन पुण्यातील महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे विश्वस्त वैभव डांगे यांनी केले आहे.