रामनवमीला गालबोट! शिवमंदिरात यज्ञ सुरू असतानाच विहिरीचे छत कोसळले, ५० भाविक पाण्यात पडले

इंदूर- रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये (Indore) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्री बेलेश्वर महादेव झूलेला मंदिरातील (Beleshwar Temple Accident) बावडीवर असलेलं छत कोसळलं आहे. यामुळे काही भाविक मंदिराच्या आवारातील विहिरीमध्ये पडल्याचं वृत्त आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, एकाचा मृत्यू झाला आहे. इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर येथील शिवमंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याने सुमारे 50 जण विहिरीत पडले आहेत. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि १०८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नाहीत. ही घटना घडली त्यावेळी मंदिरात कन्याभोज सुरू होता. या आपघातात काही मुलीही पडल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच मंदिर परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकवस्ती असून चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळेच मदतकार्य पोहचवणाऱ्या टीम्सला मंदिराच्या अधिकजवळपर्यंत जाण्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या विहिरीमध्ये पडलेल्या काही भाविकांना वर काढून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्यवर नजर ठेऊन आहेत. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून त्यामुळेही मदतकार्यामध्ये अडथळा येत आहे.