Mahayuti Meeting : भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षांचीही होणार मुंबईत संयुक्त बैठक

Mahayuti Meeting : भारतीय जनता पार्टी , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (Bharatiya Janata Party, Shiv Sena, NCP) आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या या आढावा बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, शिवसेना नेते रामदास कदम, खा. गजानन कीर्तिकर, जोगेंद्र कवाडे, आ. विनय कोरे, आ. महादेव जानकर,आ. बच्चू कडू, आ. हितेंद्र ठाकूर आणि सदाभाऊ खोत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री,भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख उपस्थित राहणार आहेत असेही आ. लाड यांनी सांगितले. ३१ ऑगस्ट रोजी रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे.१ सप्टेंबर रोजी वरळी येथे विभागनिहाय आढावा बैठका होणार आहेत , असेही आ. लाड यांनी नमूद केले.