‘उद्धव ठाकरे ‘रयत’चे अध्यक्ष व्हावेत, ही मागणी केल्यानंतर काही लाभार्थ्यांच्या पोटात दुखायच कारण काय?’

सातारा – साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून जोरदार वाद पेटला आहे. कोरेगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यावरून कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पवार घरण्यावरच निशाणा साधला आहे. रयतचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, अशी भूमिका होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली,असल्याचा घणाघाती आरोप महेश शिंदे यांनी केलाय.

रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटत असल्याचे आमदार शिंदे म्हणाले.खासदार उदयनराजे भोसले यांना रयतच्या बॉडीवर घेतले नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे.राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. असं महेश शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, शिंदे यांनी थेट पवार घराण्यालाच शिंगावर घेतल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकजण आता पवारांचा बचाव करण्यासाठी केविलवाणी धडपड करू लागले आहेत. यातूनच ते आता शिंदे यांच्यावर पातळी सोडून टीका करू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. मात्र राष्ट्रवादीकडून टीका होत असली तरीही शिंदे यांनी आपला शिंदेशाही बाणा दाखवून देत आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे संस्थेचे अध्यक्ष व्हावेत, ही मागणी केल्यानंतर काही लाभार्थ्यांच्या पोटात दुखायच कारण काय? ‘रयत’ ही महाराष्ट्राची संस्था आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला ही माझी चूक आहे.” माझ्या जिल्ह्यातल्या तरुणांना गुणवत्तेवर ‘रयत’मध्ये नोकरी द्यावी, ही माझी मागणी चुकीची आहे का? असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ज्या कुटुंबातील लोकांनी रयत शिक्षण संस्थेत योगदान दिले, ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना संस्थेतून काढू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. उद्धव ठाकरे संस्थेचे अध्यक्ष व्हावेत, ही मागणी केल्यानंतर काही लाभार्थ्यांच्या पोटात दुखायच कारण काय? असा थेट सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.