इतकं चुकीचं वागूनही साजिदला सलमान खानचा पाठींबा का मिळतोय? अभिनेत्री जयश्री गायकवाडचा सवाल

मुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान सध्या त्याच्यावर मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. पहिल्या मुलाखतीत साजिदने आपले ब्रेस्ट दाबले, पँटमध्ये हात घातला, आणखी अश्लील बोलल्याचा गंभीर आरोप जयश्रीने केला आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. यादरम्यान तिने इतकं चुकीचं वागूनही साजिदला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा पाठींबा का मिळतोय?, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) सध्या सलमान खान (Salman Khan) याच्या बिग बॉस शोमुळे (Big Boss) चर्चेत आहे. साजिद या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. मात्र बिग बॉसच्या घरात असताना एका-नंतर-एक अभिनेत्री त्याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. तरीही कलर्स मराठी किंवा बिग बॉसचा होस्ट सलमान खान त्याच्याविरोधात कोणतेही पाऊल उचलताना दिसले नाहीत.

नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलताना जयश्री म्हणाली, “साजिद खानवर इतके आरोप आहेत. त्याच्याविरुद्ध कितीतरी अभिनेत्रींनी वक्तव्ये केली आहेत. त्याच्यावर अश्लिल कृत्ये केल्याचे आरोप केले आहेत. पण इतकं चुकीचं वागूनही कलर्स चॅनलवाले का काय करत नाहीत? सलमान खान सरही त्याला का पाठींबा देत आहेत? मला खरच समजत नाहीये, इतकं चुकीचं करूनही या माणसाला कसा पाठींबा मिळतोय?”

जयश्रीने सांगितली ८ वर्षांपूर्वीची आपबिती
जयश्री म्हणाली, “मी सिनेमा इंडस्ट्रीत नवी होती. फार लोकांशी माझ्या ओळखी नव्हत्या. एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. ती पार्टी जुहूमध्ये होती. मी त्यावेळी त्यांच्यासोबत गेले. तेव्हा तिथे मला त्यांनी साजिद खानशी ओळख करुन दिली. आमचं बोलणं झालं. कामासंदर्भात मी इथे काही बोलू शकत नाही. तू माझ्या ऑफिसला ये, असं त्याने मला सांगितलं. मलाही काम हवं असल्याने मी दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचले.”

“मला दरवाजात पाहताच तो ताडकन उभा राहिला. मला घट्ट मिठी मारली. त्याचवेळी त्याने माझे ब्रेस्ट दाबले, पँटमध्ये हात टाकला. सर तुम्ही हे काय करताय, असं मी त्याला विचारलं तर एवढं तर चालतं ना.. असं म्हणून पुढे नाही नाही ते अश्लिल बोलू लागला. तुला काम हवंय.. प्रमुख भूमिका तर लगेच मिळणार नाही. तुझ्यासाठी मी प्रयत्न करेन. पण त्याबदल्यात मला काय मिळेल? असा प्रश्न त्याने मला केला.”

“यादरम्यानच्या संभाषणात त्याने नको नको ते प्रश्न विचारले. जेव्हा त्याने ब्रेस्ट दाबले अन् पँटमध्ये हात टाकला, तेव्हा इथून कधी मी बाहेर पडते असं मला झालं होतं. साधारण अर्ध्या तासाच्या संभाषणानंतर मी निघते, असं सांगून मी ऑफिसबाहेर पडले. मी जर तिथून निसटले नसते तर माझ्यावर अतिप्रसंग झाला असता”, असे खळबळजनक आरोप करत अभिनेत्री जयश्रीने आपल्यावर ओढावलेली आपबिती सांगितली.