ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी महात्मा गांधींची तसबीर काढून केबिनमध्ये दाऊदचा फोटो लावावा : राणे

मुंबई – माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता.  शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी राणे बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

निलेश राणे आणि आमदार नितेश राणे (nitesh rane) या बंधुकडून जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगली घडतील असे भाष्य केलं जात आहे, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांकडे राणे बंधुंच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी आता त्यांच्या केबिनमधील महात्मा गांधीजींची तसबीर काढून त्याठिकाणी दाऊद इब्राहिमचा फोटो लावावा. एवढंच कशाला राज्य सरकारने दाऊदला महाराष्ट्र भूषण पुरस्कारही देऊन टाकावा.

राणे यांनी म्हटले की, आमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला आहे, आम्ही काही चुकीचं बोललो का? आमची भाषा दंगलीला चिथावणी देणार नव्हती तर आम्ही हिंदुत्वाची बाजू घेऊन बोललो. नवाब मलिक मुस्लीम कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचं नाव दाऊदशी जोडलं जातं, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यावर मी एवढंच विचारलं की, मग तुम्ही अनिल देशमुख यांचा राजीनामा ते हिंदू असल्यामुळे घेतला का? आम्ही केवळ हिंदुत्वाची बाजू घेतली. देशात हिंदू-मुस्लीम दंगल होऊ नये, ही आमचीही भूमिका आहे. त्यामुळे आमचा दंगल भडकवण्याचा उद्देश नव्हता. परंतु, आम्ही हिंदूंवर अन्याय होऊन देणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले.