कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

मुंबई – पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांना जोरदार टोला लगावलाय.

यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधकांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा दावा पाटील यांनी केलाय.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण काही बोलणार नाही. पण भारतीय जनता पार्टी बूथपातळीपर्यंत भक्कम संघटनात्मक बांधणी करत आहे. त्याच्या जोरावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवू. मोदींची लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम आणि भाजपाची संघटनात्मक शक्ती यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जिंकतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय.