हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे; मिटकरींची सोमय्या-पडळकरांवर टीका

सरकारच्या नाकावर टिच्चून अहिल्यादेवींच्या स्मारकाचं पडळकरांनी केले लोकार्पण

मुंबई – सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद आज दिवसभर चर्चेचा विषय बनला होता. खासदार शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध  केल्याने आज दिवसभर पडळकर यांची चर्चा होताना पाहायला मिळाली.

शरद पवार नव्हे तर मेंढपाळाच्या हस्तेच लोकार्पण सोहळा व्हायला हवा, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली यानंतर धनगर समाजाचा देखील पडळकर याना पाठींबा मिळताना दिसून आलं. दरम्यान,कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणं शक्य नसल्याचं पाहायला मिळत होतं. अशावेळी गनिमीकाव्याने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याने सरकारची चांगलीच नाचक्की पाहायला मिळाली.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी शनिवारी दिवसभर दापोलीमध्ये अनिल परब यांच्याविरोधात रान पेटवलं. त्यानंतर रविवारी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन ठाकरे सरकारला आव्हान दिलं. या सर्व घडामोडींवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, हाय होल्टेज ड्रामेबाजाना महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे. काल कोकणात तोतला व आज इकडे मंगळसुत्र चोर जो थयथयाट करत आहेत तो थयथयाट राज्यातील हुशार तरुणाई पाहते आहे. हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे . आगामी काळात ही घाण जनताच साफ करेल.