मोदी सरकारने आदिवासींचे जल, जंगल, जमीनचे अधिकार हिरावून घेतले : जयराम रमेश

वाशिम –  आदिवासींच्या हक्क व अधिकारासाठी आदिवासांचे जननायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केला. बिरसा मुंडा यांची आज १२२ वी जयंती आहे पण आदिवासींना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाहीत. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हिताचे निर्णय घेतले होते पण वन अधिकार अधिनियम २००६ व भूमी अधिग्रहण कायदा २०१३ यातून त्यांना हक्क मिळाले होते पण मोदी सरकार आल्यापासून हे कायदे कमजोर करण्यात आलेत. आदिवासींची जमीन बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे. आदिवासींच्या जल, जंगल, जमिनचे त्यांचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत आहे असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

वाशिम येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींना वनवासी संबोधते, आदिवासी नाही. मोदी सरकार हे आदिवासींची सर्व जमीन जबरदस्तीने घेऊन उद्योगपतींना देऊन त्यांच्या हक्कांवरच गदा आणत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु या प्रकरणात लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यातील मेंडालेखा गावात एका कार्यक्रमाच्या माध्यमातून बांबू व्यापारावरील नियंत्रण ग्रामसभेला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर आर पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला होता पण त्यानंतर आलेल्या भाजपाच्या फडणवीस सरकारने हा निर्णय फिरवला व पुन्हा हे अधिकार वन विभागाला दिले. ग्रामसभा सशक्त बनवणे ह्याला काँग्रेसचे प्राधान्य आहे. आदिवासांना त्यांचे हक्क मिळावे हीच काँग्रेसची भूमिका आहे पण भाजपा आदिवासांच्या हिताच्या आड येत आहे.

भारत जोडो यात्रेचा आजचा ६९ वा दिवस आहे. या पदयात्रेत दररोज समर्थन वाढत आहे. त्यातही महिलांचा या पदयात्रेतील सहभाग हा लक्षणीय आहे. हजारोंच्या संख्येने महिला, लहान मुली पदयात्रेत मोठ्या आत्मविश्वासाने सहभागी होत आहेत असे जयराम रमेश म्हणाले.यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या महिल्या नेत्यांनी आपले अनुभव यावेळी व्यक्त केले. माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, दिवसभर पदयात्रेत चालल्यानंतरही थकवा जाणवत नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेतून एक सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे, ही सकारात्मक उर्जा माणसांना जोडण्याचे तसेच देशाला जोडण्याचे काम करत आहे.