मोदींच्या हस्ते आज काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण होणार; भाजपकडून जय्यत तयारी

वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ते काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करतील. हा दिवस महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याआधी ते काल भैरव मंदिराला भेट देतील तर संध्याकाळी गंगा आरतीतही ते सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी इथं काशी विश्वनाथ धाम उद्घाटनाचा आजचा दिवस हा भारतीय संस्कृतीसाठी अभिमानास्पद दिवस असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. दरम्यान, 13 डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. श्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन केले जाईल. यामुळे काशीच्या आध्यात्मिक चैतन्यात भर पडेल. मी तुम्हा सर्वांना उद्याच्या कार्यक्रमात सामील होण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी (Kashi Vishwanath Corridor inauguration) वाराणसी नगरी सजली आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. लोकार्पणचा हा सोहळा जवळपास तीन तास चालणार आहे. आज पंतप्रधान मोदी या कार्यक्रमानंतर 2500 मजुरांसोबत भोजन करणार असल्याची देखील माहिती आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्घाटनाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा काशीला नवी ओळख देईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तर 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वननाथ कॉरिडॉरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं.