मलिकांचे कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय?

मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून विविध पदांच्या भरतीसाठी काल आयोजित केलेल्या परीक्षा रद्द करण्यात आली. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडिओद्वारे दिली. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे सरकारचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा देखील मागितली. मात्र, अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने तसेच रात्री उशिरा याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्र्यावर सवाल उपस्थित केला आहे. “आरोग्य खात्याच्या परीक्षांचा बोजवारा उडाला, आता गृहनिर्माण खाते त्यांचा कित्ता गिरवत आहे. भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले आहे. माफी मागणाऱ्या नवाब मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय?” असा सवाल केशव उपाध्ये यांनी ट्विट करत विचारला आहे.