‘पोलार्ड तात्या’चा आयपीएलला अलविदा, भावूक पोस्ट शेअर करत केली निवृत्तीची घोषणा

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२३ हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समधून मोठी बातमी पुढे आली आहे. मंगळवारी (१५ नोव्हेंबर) मुंबई संघाचा अनुभवी अष्टपैलू कायरन पोलार्ड याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत पोलार्डने निवृत्तीबद्दल माहिती दिली आहे. तसेच आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर पोलार्ड (Kieron Pollard) मुंबई संघाचा (Mumbai Indians) फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजच्या या दिग्गज अष्टपैलूला मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई संघाने रिलीज केल्याचे वृत्त आले होते. १२ वर्षे मुंबईकडून खेळल्यानंतर संघाने पोलार्डला रिलीज करण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर मंगळवारी दुपारी अचानक निवृत्तीची घोषणा करत पोलार्डने आयपीएलप्रेमींना चकित केले आहे. आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये पोलार्डने लिहिले आहे की, त्याला आणखी काही वर्षे मुंबई संघाकडून खेळायचे होते. परंतु मुंबई संघासोबत बातचीत झाल्यानंतर त्याने आयपीएलला अलविदा (Kieron Pollard Retirement) करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलार्डने आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मुंबई इंडियन्सला बदलाची गरज आहे. जर मी आता मुंबई इंडियन्सकडून खेळू शकत नाही, तर मी स्वतःला मुंबईविरुद्ध खेळतानाही पाहू शकत नाही. मी कायम मुंबईचा खेळाडू राहणार आहे.’

दरम्यान पोलार्डने २०१० साली मुंबई संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आयपीएल २०२२ पर्यंत त्याने मुंबई संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यादरम्यान त्याने १८९ सामने खेळताना २८.६७ च्या सरासरीने ३४१२ धावा केल्या होत्या. तसेच त्याच्या खात्यात ६९ विकेट्सचीही नोंद आहे. याबरोबरच त्याने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० असे ५ हंगाम मुंबईला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात योगदान दिले आहे.