कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या बाळासाहेबांचा मुलगा आज…; ‘सिल्वर ओक’वर जाऊन भेट घेतल्याने ठाकरेंवर होतेय टीका

Sharad Pawar Uddhav Thackeray meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पवार यांचे निवास स्थान ‘सिल्वर ओक’मध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यादेखील उपस्थित होत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली.

दरम्यान, या भेटीवर आता शिवसेनेने टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटीबद्दल प्रतिक्रिया दिली असून आपल्या खास शैलीत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली.आजही काही बैठका होत्या मात्र त्या बैठका देखील रद्द झाल्या. या बैठका नक्की का रद्द झाल्या याची माहिती माध्यमांनी घ्यावी.आमच्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा गायब असल्याने आणि या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवल्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली आहे. शरद पवार आपली साथ सोडतात की काय ? अशी भीती वाटल्यानेच ‘काका मला वाचवा’ असं म्हणत उद्धव ठाकरेनी घाबरून शरद पवार यांची आज त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याचे मत म्हस्के (Naresh Mhaske) यांनी व्यक्त केले आहे.

लाचारांची स्वारी सिल्व्हर ओक च्या दारी…ठाकरे आडनावाचा वारसा मिळाला असला तरीही स्वाभिमानाचा वारसा मात्र उद्धव ठाकरे यांना लाभलेला नाही, त्यामुळेच कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या बाळासाहेबांचा मुलगा असूनही खाली मान घालून पवारांच्या घरी‌ त्यांची मनधरणी करायला जावं लागलं असं मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आज पक्ष गेले, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला अशी झाली असल्याचे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.