राष्ट्रवादी काँग्रेसला वाढत्या महागाईची चिंता; पावसाळ्यात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारला मागणी

मुंबई :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP’s chief spokesperson Mahesh Tapase) यांनी टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पावसाळ्यामुळे फळभाज्यांचे भाव सर्वीकडे वाढले असून सर्वसजनतेच्या खिशाला कात्री लागत आहे.या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून उपाय योजना करण्याची मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

पावसाळ्यात स्वस्त धान्य दुकानांमध्ये अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असेल अशी अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली. भाजीपाल्यांचे व दुधाचे दर वाढल्यानंतर मध्यमवर्गीय व गरीब जनता राशन दुकानाकडे धाव घेते व अशा परिस्थितीमध्ये अन्न मंत्रालयाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकान येथे मुबलक पुरवठा असण्याची गरज आहे व तशी उपाययोजना सरकारने करावी.

मान्सूनच्या मोसमातील आव्हाने अधोरेखित करून तपासे यांनी महाराष्ट्र सरकारने आमदारांची चिंता करण्याऐवजी नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

पावसामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास आणि परिणामी भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यास बाजारात पाम तेल, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, साठवणूक किंवा काळाबाजार होणार नाही याची खात्री सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी महेश तपासे यांनी केली.

महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी पक्षाच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करून तपासे पुढे म्हणाले अन्नधान्य आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीत कोणतेही व्यत्यय किंवा गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.