‘महाभारतील अर्जुनाप्रमाणेच राजकीय कुरुक्षेत्रावर आमचाच विजय होईल’, Rohit Pawar यांनी व्यक्त केला विश्वास

NCP Party and Symbol : शिवसेना पक्ष (Shivsena) आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाच्या हाती गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर काय निकाल लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता अजित पवारांचा (Ajit Pawar) गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Party) असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने (Election Comission) दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे. महाभारतातील प्रसंगाचा उल्लेख करत रोहित पवार म्हणाले, महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या मनात खच्चून अहंकार भरलेला असल्याने तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ न बसता उशाजवळ बसला पण अंगी कमालीची नम्रता असल्याने अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी बसला… भगवान श्रीकृष्णाने झोपेतून डोळे उघडताच त्याला प्रथम पायाशी बसलेला अर्जुन दिसला आणि त्याला विचारलं तुला काय पाहीजे? तेंव्हा अर्जुनाने सांगितलं तुमचं मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला होकार दिला. नंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यालाही विचारलं तुला काय हवंय? यावेळी अहंकाराने मदमस्त झालेल्या दुर्योधनाने विचार केला एकट्या श्रीकृष्णाला आपल्या सोबत घेण्याऐवजी त्याची विराट नारायणी सेना घेतलेली कधीही फायदेशीर ठरेल. म्हणून स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली. अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या तुंबळ युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला…

कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते…. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय.. ‘महाशक्ती’च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं त्यातून प्रेरणा घेऊन आदरणीय पवार साहेब हे आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार!, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?