लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा भोवला; दोन ग्रामसेवक निलंबित

वाशिम – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहीम सूक्ष्म नियोजनातून राबविण्यात येत आहे. यासाठी लसीकरण केंद्रावर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. सुट्ट्यांच्या दिवशी देखील लसीकरण केंद्रातून लसीकरण करण्यात येत आहे.

आज 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी वाशिम तालुक्यातील काही गावातील लसीकरण केंद्राला आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मंगरूळपीर तालुक्यातील शिवनी येथील ग्रामसेवक अनंता गायकी आणि वाशिम तालुक्यातील सावळी येथील ग्रामसेवक मळघणे हे गैरहजर आढळून आले. त्यांच्या या गैरहजरीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी आज 19 नोव्हेंबर रोजी एका आदेशाद्वारे या दोन्ही ग्रामसेवकांना निलंबित केले.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी जिल्हा व तालुका पातळीवर वारंवार सभा घेण्यात येत आहे. लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून त्याबाबत त्यांना तसे लेखी आदेश दिले आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यात दररोजचे लसीकरणाचे प्रमाण हे इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. लसीकरण करण्यासाठी नियुक्त केलेले काही कर्मचारी लसीकरणाचे काम गांभीर्याने घेत नसल्याचे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकस्मिक भेटीतून दिसून आले आहे.त्यामुळे त्यांच्यावर निलंबनासारखी कारवाई करण्यात येत आहे.