कर्नाटकमधील शाळांमध्ये नवा वाद, हिजाबचा वाद संपेपर्यंत आता बायबलवरून गोंधळ झाला सुरु

बेंगळुरू – बंगळुरुतील क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनानं शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एक अर्ज भरून घेतला आहे. मुलांना शाळेत बायबल ग्रंथ नेण्यामध्ये आपल्याला काहीच अडचण नाही असं वचन या अर्जामधून पालकांकडून घेण्यात आलं आहे, असं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षणाधिकार अर्थात कर्नाटकातील एज्युकेशन ॲक्टचं (Education Act) उल्लंघन असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे.

शाळा बिगर ख्रिश्चन विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत असल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा यांनी केला आहे. या शाळेत बिगर ख्रिश्चन विद्यार्थीही शिकतात, असा दावाही गटाकडून करण्यात आला आहे. या सूचनेद्वारे त्यांना जबरदस्तीने बायबलचे वाचन करण्यास भाग पाडले जात आहे असा आरोप होत आहे.  हिंदू जनजागृती समितीने या प्रकरणी शाळेवर कारवाई करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यालयात इयत्ता 11 च्या प्रवेश फॉर्ममध्ये पालकांकडून मुद्दा लिहून घेतला जात आहे की , तुम्ही पुष्टी करता की तुमचा मुलगा त्याच्या स्वतःच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी मॉर्निंग असेंब्ली स्क्रिप्चर क्लासेस आणि क्लबसह सर्व वर्गांना उपस्थित राहील आणि या काळात बायबल आणि इतर गोष्टी बाळगण्यास हरकत नाही.