भारताचं तिसऱ्या वनडे विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण करणार ‘हे’ ३ शिलेदार? शुभमन गिलही यादीत

समस्त क्रिकेटप्रेमींचे लक्ष येत्या वनडे विश्वचषक 2023 कडे (ODI World Cup 2023) लागून आहे. या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतीय भूमीवर विश्वचषक 2023 खेळला जाणार आहे. घरच्या मैदानावर होणारा हा विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे. 12 वर्षांपूर्वी त्यांच्याच भूमीवर खेळलेल्या 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत शेवटचा विश्वविजेता बनला होता आणि आता भारतीय संघाकडे विश्वविजेतेपदाचा हा दुष्काळ संपवण्याची चांगली संधी चालून आली आहे. कर्णधार रोहित शर्माकडे (Captain Rohit Sharma) असे 3 घातक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे विश्वचषक 2023 मध्ये सामना फिरवण्याची ताकद आहे आणि यावेळी हे खेळाडू भारताला विश्वचषक 2023 ट्रॉफीपर्यंत नेऊ शकतात. चला अशा 3 खेळाडूंवर एक नजर टाकू जे भारतीय संघाला वनडे विश्वचषक 2023 ट्रॉफी जिंकण्यात मदत करू शकतात. (Key Players For ODI World Cup 2023)

सूर्यकुमार यादव-
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या वर्षी भारताला विश्वचषक 2023 ची ट्रॉफी जिंकून देऊ शकतो. सूर्यकुमार यादवच्या रूपाने भारताला असा स्फोटक फलंदाज मिळाला आहे, जो मैदानाभोवती 360 डिग्रीत चौकार-षटकार मारण्याची ताकद राखतो. तसेच तो भारतीय संघासाठी फिनिशरचीही भूमिका पार पाडू शकतो. सूर्यकुमारचे वनडेतील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले आहे. त्याने 20 वनडे सामन्यात 433 धावा फटकावल्या आहेत.

हार्दिक पंड्या-
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सर्वात मोठा सामना विजेता ठरू शकतो. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या मोठी भूमिका बजावू शकतो. तो विस्फोटक फलंदाजीसह दमदार गोलंदाजी करण्याचीही क्षमता राखतो. तसेच त्याचे अलीकडच्या काळातील वनडेतील प्रदर्शनही लक्षणीय राहिले आहे. तो संघासाठी फिनिशरची भूमिकाही बजावू शकतो.

शुभमन गिल-
शुभमन गिल (Shubman Gill) या वर्षी भारताला विश्वचषक 2023 ची ट्रॉफी जिंकून देऊ शकतो. आपल्या जबरदस्त फॉर्मसह, शुभमन गिलने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 2023 वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. शुभमन गिल बॅटने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने गेल्या काही महिन्यांत अनेक विक्रम केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा तो भारतीय आहे. तसेच त्याने नुकतेच वनडेत द्विशतकही झळकावले आहे.