संभाजी भिडेंचा नांदेड दौरा वादात, सभा उधळून लावण्याचा इशारा

Sambhaji Bhide – शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhaji Bhide) आज आणि उद्या दोन दिवसीय नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान हदगाव, भोकर, नायगाव व नांदेड येथे त्यांच्या जाहीरसभा व बैठका होणार आहेत. मात्र संभाजी भिडेंच्या नांदेड दौऱ्याला विरोध करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडेंची सभा उधळून लावण्याचा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्यावतीने देण्यात आला आहे. भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवदेन देण्यात आले आहेत. ‘देशद्रोही वक्तव्य करून धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांची जाहीर सभा भोकरमध्ये 13 रोजी होत आहे. त्यामुळे भिडे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संभाजी भिडे यांची सभा नांदेडमध्ये 14 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे ही सभा रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.संभाजी भिडे यांच्याविरुध्द भीमा कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तसेच ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करुन वाद निर्माण करतात. त्यांची सभा नांदेडमध्ये ठेवून काही जण जातीय तेढ निर्माण करु पाहत आहेत. पोलिसांनी भिडे यांच्या कार्यक्रमावर बंदी टाकावी. अन्यथा आम्ही ही सभा उधळून लावू. असेपोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.