काल झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करण्याचे आदेश; राजनाथसिंग संसदेत देणार निवेदन

कुन्नूर- तमिळनाडूमध्ये कुन्नूरजवळ काल दुपारी भारतीय वायुदलाचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि संरक्षण दलाच्या अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून संरक्षणमंत्री राजनाथसिंग आज संसदेत या अपघाताबाबत निवेदन देणार आहेत.

दरम्यान,बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिव देहावर उद्या दिल्ली कँटोन्मेंट इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव शरीर आज संध्याकाळपर्यंत लष्करी विमानातून दिल्ली इथं पोहोचण्याची शक्यता आहे.

त्यापूर्वी आज वेलिंग्टन इथल्या मद्रास रेजिमेंट सेंटरमध्ये श्रद्धांजली सभा होणार असून त्यानंतर पार्थिव देह दिल्लीला नेण्यात येईल. पार्थिव देह नवी दिल्लीतील जनरल रावत यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत जनतेला अंतिम दर्शन घेता येणार आहे.

देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, यांनी दुःख व्यक्त केलं आहे. जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूनं आपल्याला मोठा धक्का बसला. देशानं एक शूर पूत्र गमावला असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

बिपीन रावत हे शूर सैनिक आणि सच्चे देशभक्त होते. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या निधनानं आपल्याला तीव्र दुःख झालं आहे. देश त्यांच्या सेवेचं कायम स्मरण करेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.