Pankaj Gore | खान्देशाचे कान्हादेश नामकरण करावे, ऍड. पंकज गोरे यांची साहित्य महामंडळाकडे मागणी

Pankaj Gore : खान्देशाचे कान्हादेश असे नामकरण करण्यात यावे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी ऍडवोकेट आणि धुळ्याचे युवासेना अध्यक्ष पंकज गोरे (Pankaj Gore) यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे केली आहे. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे.

यंदा अनेक वर्षानंतर कान्हा देशाच्या मातीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत हे संमेलन होत असल्याचा विशेष आनंद होत आहे. कान्हा देशाला साहित्य आणि संस्कृतीचा खूप मोठा वारसा लाभला असून या कान्हा देशाचा इतिहास मोठा रंजक आहे. या प्रदेशाला प्राचीन काळात असिक किंवा ऋषिक असे म्हणत असत. रामायण आणि महाभारत काळात या प्रदेशाचा उल्लेख आलेला असून राम सीता वनवासात असताना सीतेच्या शोधासाठी सुग्रीवाने वानरांना विदर्भ ऋषिक व महिशक या प्रदेशात जाण्यास सांगितले होते असे रामायण या ग्रंथात याचा उल्लेख आढळून येतो. यावरून रामायण, महाभारत काळात या प्रदेशाविषयी माहिती आपणास मिळते. तसेच नाशिक येथील सातवाहन कालीन लेणीतील अभिलेखातही ऋषीकाचा उल्लेख असून हा लिखित पुरावा ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. यादवकाळात सेऊनदेश म्हणून या प्रदेशाचा अंतर्भाव होतो. खानदेशचा प्रथम उल्लेख इतिहासात फेरीस्ताच्या बखरित आढळतो.

प्राचीन काळात खानदेशच्या इतिहासाची सुरुवात अशीरगड व तोरण या डोंगरी किल्ल्यांच्या संदर्भात असून महाभारतामध्ये युवानाश्व नावाचा तोरणमाळचा राजा असल्याचा उल्लेख आढळतो. या राजांनी पांडवांशी संघर्ष केला होता. याच कालावधीत असिरगड येथे अश्वत्थामाची पूजा अर्चा होत होती. तसेच खान्देशाला महाभारत काळात खांडव वनभूमी म्हणून संबोधले जात होते. ही भूमी श्रीकृष्णाची भूमी म्हणून ओळखली जात होती. म्हणूनच या प्रदेशात श्रीकृष्णाची भक्ती करणारे असंख्य लोक राहत होते. मध्ययुगात तेराव्या शतकापासून या प्रदेशावर मुसलमानी सत्ता होती. गुजरातच्या राजाने या प्रदेशावर अंमल गाजविणाऱ्या आरोपी सुलतानांपैकी राजा मलिक नासिक याला खान ही पदवी दिली होती. या फारुकी राजाने थाळनेर येथे राजधानी स्थापन करून या परिसरात राजवट उपभोगली म्हणून खानाच्या प्रभुत्वाखाली असलेला प्रदेश म्हणजे खान्देश असा उल्लेख केला जातो, काळाच्या ओघात कान्हा देशाचे अपभ्रंश होऊन खानदेश असे नामकरण झाले असून साहित्य संमेलनात होणाऱ्या विविध ठरावांमध्ये खानदेशाची कान्हादेश नामकरण करण्याबाबत ठराव पारित करण्यात यावा, या मागणीचा प्रस्ताव ऍड.पंकज गोरे यांच्या तर्फे साहित्य महामंडळाकडे देण्यात आला आहे.

तसेच ही कान्हादेशची ही भूमी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिभासंपन्न काव्याने देखील समृद्ध झाली असून स्वतः अशिक्षित असून देखील सुशिक्षित असणाऱ्यांना विचार करायला लावणारे काव्य बहिणाबाई चौधरींनी लिहिले. बहिणाबाई चौधरी ह्या कान्हादेशाचं वैभव असून आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यात आले, याचा आम्हाला अभिमान आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाई चौधरी यांनी संपूर्ण जीवनाचे आणि जगण्याचे तत्वज्ञान आपल्या काव्यातून मांडले आहे. जागतिक पातळीवर बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याची दखल घेतली जाते. तसेच जगभरातील अनेक विद्यार्थी त्यांच्या काव्यावर प्रचंड अभ्यास आणि विपुल स्वरूपात लेखन करीत आहे. कान्हा देश ही त्यांची कर्मभूमी राहिली असून याचा येथील प्रत्येकाला अभिमान आहे. बहिणाबाई चौधरी या फक्त कान्हा देशाचे वैभव नसून जगभरातील मराठी माणूस जिथे जिथे पोहोचला आहे तिथे तिथे बहिणाबाई चौधरी यांचे नाव पोहोचले असून प्रतिभासंपन्न काव्य लिहिणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, या मागणीचा प्रस्ताव ऍड पंकज गोरे यांच्या वतीने साहित्य महामंडळाकडे देण्यात आला आहे.

या प्रस्तावाचे एडवोकेट पंकज गोरे हे सूचक असून कवी जगदीश देवपूरकर आणि धनंजय दीक्षित यांनी अनुमोदक म्हणून आपल्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या दोन्ही मागण्यांचा प्रस्ताव साहित्य महामंडळाचे अविनाश जोशी यांच्याकडे देण्यात आला असून यावेळी पत्रकार अनिल चव्हाण आणि जगदीश चव्हाण हे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा