मी ब्राम्हण नाही तर मी ९६ कुळी मराठा आहे; तृप्ती देसाई यांनी ट्रोल करणाऱ्यांना झापलं

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलं आहे. केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी (Ketki Chitale remanded in police custody till May 18) ठोठावण्यात आली आहे.

केतकी चितळेने  शरद पवार यांच्यावर केलेली ती वादग्रस्त पोस्ट ही 2020 सालची असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी ही पोस्ट तितकी व्हायरल झाली नव्हती, मग आता ती रीपोस्ट करून व्हायरल करण्यामागे काही षडयंत्र आहे का याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत.

या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच आता या वादामध्ये भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाईंनी (Trupti Desai) उडी घेतलीय. देसाईंनी केतकीचं समर्थन केलंय. केतकीच्या पोस्टमध्ये थेट नाव घेण्यात आलेलं नाही असं सांगताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केलीय.अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तिने जर जाणूनबुजून पवारांविरोधात लिहिलं असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिला विरोध करतायत, तिला ट्रोलिंग करतायत, तिचे आक्षेपार्ह फोटो टाकतायत, शिवागाळ करतायत मग त्या कारवाई का होत नाही?,” असा प्रश्न तृप्ती देसाईंनी विचारलाय.

केतकी चितळेला पाठिंबा दिल्यावर सगळे जातीवर येतात,” अशी खंतही तृप्ती यांनी व्यक्त केलीय. “ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न करता. अनेकजण म्हणतात त्या चितळे आहेत तुम्ही देसाई आहात. त्या ब्राह्मणआहेत तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून तुम्ही सपोर्ट करताय. म्हणून मी सोशल मीडियावर लोकांना सांगितलं की मी ब्राम्हण मुळीच नाही. मी ९६ कुळी मराठा आहे. मी ज्या ९६ कुळी मराठ्यांच्या घरातून येते तिथे मला सर्वधर्म समभावाचा आणि परखड मत मांडण्याचा अधिकार आणि संस्कार दिलेत, म्हणून मी माझं मत मांडलं आहे. केतकी चितळेचा अटक केलीय, तिच्यावर वेगवेगळे कलम लावलेत मग तुमच्या समर्थकांवरही तसेच गुन्हे दाखल करा,” अशी मागणी तृप्ती यांनी केलीय.