ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती! : अशोक चव्हाण

मुंबई: जनतेला विकास हवा आहे. देव-धर्माच्या नावावर राजकारण नको. देव-धर्म ही वैयक्तिक आस्थेची बाब आहे. त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल तर ‘ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती’, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निर्णायक विजयानंतर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. काँग्रेसला समाजाच्या सर्व थरातून पाठिंबा मिळाला. हा विकासाचा, सर्वसमावेशकतेचा आणि एकतेचा विजय आहे. रोजगार, महागाई, सुरक्षा, शांतता, विकास हेच जनतेचे प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेसने लोककल्याणकारी योजनांचा जाहीरनामा मांडला. त्यातील आश्वासने एका वर्षात पूर्ण करण्याचा शब्द दिला आणि लोक काँग्रेसच्या पाठीशी उभे झाले, असे ते म्हणाले.

भाजप डबल इंजीनचा गवगवा करते. मात्र कर्नाटकमध्ये त्यांना विकास करता आला नाही. शेवटी देव-धर्माच्या नावावर मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिलेला बंधुभावाचा संदेश लोकांना भावला. काँग्रेसच्या विचारधारेला समर्थन मिळाले. कर्नाटकातील विजयाचा पाया भारत जोडो यात्रेतच रचला गेला, असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.