बैलगाडा शर्यतीला परवानगी हा सरकारचा पाठपुरावा व शेतकऱ्यांच्या लढाईचा विजय : नाना पटोले

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांच्या मागणीला व राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश येऊन काल सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली याचा आनंद आहे. सरकारचा पाठपुरावा व शेतकऱ्यांच्या लढाईचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, बैलगाडी शर्यत ही ग्रामीण भागातील बळीराजाची परंपरा आहे. त्यावर बंदी घालण्यात आलेली होती. परंतु ही बंदी उठवून परंपरेने चालत आलेली बैलगाडी शर्यत सुरु रहावी यासाठी राज्य सरकारने जी भूमिका सुप्रीम कोर्टात मांडली आणि मंत्री सुनील केदार व इतर संघटनांनी जो सातत्याने पाठपुरावा केला, त्याच्या परिणामी आज न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली, आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.

बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागात बैलाच्या मालकांसाठी प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते तसेच गाव खेड्यातील लोकांसाठी ही एक पर्वणी असते. सुप्रीम कोर्टाने या शर्यतींना सशर्त परवानगी दिल्याने सात वर्षांनंतर पुन्हा बैलगाडा शर्यत राज्यात सुरु होत आहे. बैलांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेत न्यायालयाने घालून दिलेल्या अटी लक्षात घेऊनच शर्यती घ्याव्यात असेही नाना पटोले म्हणाले.