आपल्या देखील कपाळावर भक्त, गुलाम किंवा तत्सम शिक्का नाही असे कसे समजायचे..?

उल्का ताई, हरी भाऊ आणि तिळपापड..!

उल्का ताई, हरी भाऊ आणि तिळपापड..!

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊन आज जवळपास महिना पूर्ण होत आहे. निवडणुकीपूर्वी एकत्र युती आणि आघाडी करून लढलेले महत्वाचे सत्ता पक्ष; अडीच वर्षापूर्वी जसे लढले होते, त्या मूळ सत्य स्वरूपात आज पुन्हा एकत्र आलेले दिसत आहेत. त्यात एका मुख्य सत्ताधारी पक्षाच्या २/३ हून जास्तीच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येत एक उठाव उभा केला आणि अनैसर्गिक सत्ता उलथवून इतिहासाला साक्षी मानून पुन्हा नैसर्गिक मित्राचा हात हातात घेतला आहे. या उठावाला जो तो आपल्या चष्म्याच्या काचेतून पाहत आहे. कोण बंड म्हणतेय, कोण उठाव, कोण गद्दारी, कोण अजून काही.. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या केमिकल लोच्यातून या उठावाच्या लिटमसला कोणता रंग यायचा तो येत आहे. आणि आलेला माझाच रंग खरा कसा हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे तर होत राहणार, त्यावर कुणाला हरकत देखील नसावी. परंतु या संपूर्ण कॅनव्हास मध्ये दोन विचारवंतांच्या बौद्धिक विचारांची कललेली विचारधारा अगदी ठळकपणे राजकीय आकसाकडे उत्तेजीत होऊन प्रवाहित झालेली आहे, असे स्पष्ट दिसून येत आहे. ते दोन आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य असणारे उल्का ताई महाजन (Ulka Mahajan)आणि हरी भाऊ नरके(Hari Narke)..!

मतदारांचा, लोकशाहीचा व संविधानाचा मान न राखता सध्याचे सरकार भ्रष्टाचाराच्या आधारे सत्तेवर आले आहे, असे उल्का ताई महाजन यांनी आपल्या पुरस्कार नाकारण्याच्या पत्रात वगैरे म्हंटल आहे, अशी चर्चा आहे. ते पत्र आता मी प्रत्यक्ष ना पाहिले ना वाचले. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून जे समोर येत आहे त्याचा मतितार्थ वरील चर्चेसारखाच आहे. उल्का ताई यांचे आदिवासी बांधवांसह इतर विविध सामाजिक बाबतीत असलेले काम डोक्यावर घेऊन उदो उदो करण्यासारखे अभिमानास्पद असेच आहे. डाव्या विचारांनी त्या प्रेरित असल्याचे सर्वश्रुत आहे. कित्येक कॉम्रेडप्रेरित आंदोलने, मोर्चे, निवडणुका थेट डाव्या विचारसरणीला पायाभूत मानून त्यांनी आजपर्यंत केलेल्या आहेत. अगदी एल्गार परिषदेत मनूवाद्यांवर त्यांनी केलेला शाब्दिक हल्ला देखील तसा गाजला होताच. एकंदरीत भांडवली विचारसरणीच्या विरोधात असल्याने बाय डिफॉल्ट मोदी – शहा पर्यायाने भाजपला त्यांचा विरोध आलाच, तो त्यांच्या लेखनातून, बोलण्यातून सततचा जाणवत राहतो. त्यामुळे हे नवे नैसर्गिक सरकार त्यांना पूर्वग्रह विचारसरणी दोषामुळे लोकशाहीचा मान न राखता तयार झाले आहे असे वाटणे अत्यंत साहजिक आहे.

शिवसेना + भाजप या पिढ्यान् पिढ्या एकत्र नांदत असलेल्या पक्षांनी एकत्र युतीत लढत घवघवीत यश २०१९ च्या विधानसभेत मिळवले. परंतु त्यावेळी आपल्या सोबत युतीत असलेल्या आणि सर्वात मोठा पक्ष ( १०५ आमदार ) असलेल्या भाजपला दूर ठेवत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडीचा प्रयोग केला. तो ताईंसाठी लोकशाहीची, मतदारांचा, संविधानाचा अपमान अजिबात नव्हता. अजिबात नव्हता.. तिथे मतदारांचा कौल पायाखाली तुडविला गेला असे अजिबात ताईंना वाटले नाही. कदाचित आपल्या विचारसरणीला साजेशे लोक सत्तेत आल्याचा त्यावेळी आनंद असू शकतो. हरकत नाही.. परंतु आता मात्र सगळ्याचा अपमान होत असल्याची जाग ताईंना आली आणि त्यांचा विवेक अखेर अडीच वर्षांनी का होईना पण जागा झाला. हरकत नाही, एकंदरीत सारासार विचार करता आता विवेक जागा होणारच होता, त्यामुळे त्यावर खूप आश्चर्य वाटावे असे काहीच नाही.

दुसरा ताईंचा मुद्दा होता भ्रष्टाचाराचा..! ताई आपण चळवळीतील कार्यकर्त्या आहात, सामाजिक, राजकीय आंदोलन तेवत ठेवणाऱ्या नेत्या आहात.. जर आपल्याला असे वाटत असेल की या संपूर्ण सत्तानाट्यात भ्रष्टाचार हाच मूळ मुद्दा आहे तर आपल्या स्वभावानुसार आपण ते सर्व पुरावे न्यायालयात द्यायला हवेत, चला न्यायालय दूर ठेवू कमीत कमी जनतेच्या न्यायालयात तरी ते सादर करायला हवेत. पण नाही.. आपण तसे काहीच न करता आत्मक्लेशाकडे वळलेल्या दिसत आहात. पण ताई आपली विचारधारा आत्मक्लेश करत नाहीत, ती चळवळीतून न्यायाला तोंड फोडत असते. पण इथे वेगळीच भूमिका आपण घेत आहात, विचारांशी प्रतारणा तर करत नाहीत ना.? याचे तुम्हालाच चिंतन करावे लागेल. "आपला तो बाब्या" या विचारसरणीतून आपल्यासारख्या विचारवंतांनी तरी शक्य असल्यास बाहेर पडावे, ही माफक अपेक्षा आहे.

आता दुसरे विचारवंत आहेत डॉ. हरी भाऊ नरके.. जे महविकास आघाडी सरकार बरखास्त झाल्याने सर्वात अधिक आकडतांडव करत आहेत, अशी संबंध महाराष्ट्राची पक्की खात्री झाली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या पेक्षा जास्त दुःख हरी भाऊ यांना झाले आहे, हे त्यांच्या सोशल मीडियातील आदळआपट वरून तर स्पष्टच आहे. मला जे पटते ते मी लिहतो, मी माझ्या विचारांशी कधीच प्रतारणा करत नाही, मी कोणत्याही पक्षाची तळी उचलत नाहीत, असे म्हणणारे डॉ. हरी भाऊ तर एका पक्षाच्या प्रवक्त्यांसारखे ( तसे ते अधिकृत नसले तरी ‘ त्या ‘ पक्षाचे प्रवक्ते आहेत हे जगजाहीर आहे) दणादण जमेल तसे बॅटिंग करत आहेत. जे काही चुकीचे, असंवैधानिक, भ्रष्ट घडत आहे ते आताच होत आहे अशी त्यांची ठाम धारणा झालेली आहे. अगदी राजकीय पातळीवर घसरत एका विशिष्ट पक्षाची सुपारी ते वाजवत आहेत, हे सरळ सोट दिसून येत आहे. एखादा लहान मुलगा त्याला पाहिजे असलेली गोष्ट भेटली नाही किंवा त्याला वाटते तसे झाले नसल्यावर, ज्याप्रमाणे चिडखोर होतो, बालिशपणे गडागडा लोळतो, विवेकशून्य धिंगाणा घालत असतो..अगदी तशीच सेम टू सेम अवस्था डॉ. हरी भाऊ यांची झालेली आहे, अशी सामाजिक क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

असो, थोडक्यात काय तर आपल्या बुद्धीला जेंव्हा आपण एका विशिष्ट किंवा समकक्ष विचारसरणीच्या वेशीला टांगून घेतो, तेंव्हा तटस्थ गावच्या वेशीवर आपण किती दर्जेदार आणि निरपेक्ष आहोत हे सांगण्यासाठी प्रवचने, कीर्तने का घ्यावीत..? आपली बुद्धी गहाण नाही असे कसे म्हणावे..? आपल्या देखील कपाळावर भक्त, गुलाम किंवा तत्सम शिक्का नाही असे कसे समजायचे..? तेंव्हा विचारवंतांनो, विचार – तत्व – निरपेक्षता – भूमिका या मागचं सगळं सत्य आता नागडं करू घ्याच एकदा..! मग कळेल हा तिळपापड का होतोय ते…!

– श्री. प्राजक्त झावरे पाटील, कल्याण
( निरपेक्ष आहे असे खोटे न सांगणारा; पण चळवळीतला सामान्य कार्यकर्ता )