छगन भुजबळ यांच्या हस्ते प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : साहित्य संमेलनाची सुरुवात प्राजक्त प्रभा कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि काव्य वाचन कार्यक्रमातून होत आहे. या होणाऱ्या साहित्य संमेलनाचे आदरतिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील असा विश्वास असून नाशिमध्ये होणारे हे साहित्य संमेलन अविस्मरणीय राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत आहे.या संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा श्रीगणेशा आज अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ या काव्य संग्रहाचे प्रकाशनाने झाला. या काव्य संग्रहाचे प्रकाशन पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडले.

यावेळी खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, मराठी साहित्य मंडळाचे मिलिंद जोशी, उपाध्यक्ष सुधाकर शिशोदे, संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर,मुकुंद कुलकर्णी, खान्देश मराठा मंडळाचे सेक्रेटरी अविनाश पाटील, अशोक पाटील, मुलाखतकार स्वाती प्रभू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे साहित्य संमेलन पुढे पुढे जात होते. होईल की नाही याबाबत प्रश्न होता. मात्र सर्व नाशिक कर ठाम होते. त्यादृष्टीने होणारे साहित्य संमेलन अतिशय उत्कृष्ट होईल. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील यासाठी प्रयत्न आहे. साहित्य संमेलनाची तयारी नाशिक कारांकडून अतिशय दर्जेदार करण्यात येत आहे. नाशिकच्या या संमेलनात काव्य कट्ट्यासाठी सुमारे साडे नऊशे हुन अधिक कवी सहभागी होणार असून काव्य वाचनाचा विक्रम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यात आपण यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करत यावेळी प्राजक्त प्रभा या कविता संग्रहातील काही कवितांचे वाचन त्यांनी यावेळी केले.

यावेळी अभिनेत्री कवयित्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, माझ्या आयुष्यातील पहिल्या कविता वाचन आज होत आहे. तसेच काव्य संग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे. हा माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण आहे. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनास मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मिळाले हे माझे भाग्य आहे. रसिकांचा मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानते असे त्यांनी यावेळी सांगत प्राजक्त प्रभा काव्य संग्रहाच्या प्रवासाचे वर्णन केले. यावेळी मराठी साहित्य मंडळाचे मिलिंद जोशी, खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हे देखील पहा