पवारांच्या राजीनाम्याने राष्ट्रीय राजकारणात खळबळ; राहुल गांधी यांचा थेट सुप्रिया सुळे यांना फोन

Mumbai – ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Sharad Pawar Announced Retirement) देत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवारांनी हा निर्णय घेऊ नये यासाठी सर्वच नेत्यांनी त्यांना गळ घातली. यानंतर आता राष्ट्रवादीत राजीमान्यांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. तसेच  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आमदार अनिल पाटील हे राजीनामा देत असल्याचे पत्र शरद पवार यांना दिलेले आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या राजीनाम्याची दखल राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही घेतली आहे. या नेत्यांनी पवार यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केला आहे. या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांनी राजीनामा का दिला? याची माहिती सुप्रिया सुळेंकडून घेतली आहे. तसेच पवार यांनी राजीनाम्याचा पुनर्विचार करावा, अशी विनंती या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केल्याचं समजतं. तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राष्ट्रवादीचे नेते पीसी चाको यांना फोन करून पवार यांच्या राजीनाम्याचं कारण समजून घेतल्याचं वृत्त आहे.