‘चॅनेलचे माईक चालू असतात हे भान ठेवून…’, मराठा आंदोलनावरून राज ठाकरेंचा शिंदे सरकारला सल्ला

Maratha Reservation: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. अशातच नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आपण फक्त बोलून निघायचं का? असा प्रश्न विचारत आहेत. दरम्यान या मुद्द्यावर राज ठाकरेंनीही (Raj Thaackeray) व्हायरल व्हिडीओवरुन सरकारला सल्ला दिला आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.

राज ठाकरे पुढे म्हणतात, आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे.

‘गेले १७, १८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनेल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो. असा चिमटा राज ठाकरेंनी काढला आहे.