बच्चे की जान लोगे क्या ? आदित्य ठाकरेंविरोधात कारवाईचे आदेश दिल्यानंतर राणेंचा खोचक टोला

मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी नोटीसच राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाच्या (National Commission for Child Rights) वतीने मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. आंदोलनात प्रथमदर्शनी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेनं केली होती.

राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी  मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आरे बचाव आंदोलनात (aarey forest protest) लहान मुलांचा उपयोग केल्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची सूचना राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने दिली आहे.  3 दिवसांत एफआयआरसह अहवाल देण्याचा राष्ट्रीय बाल आयोगाने मुंबई पोलिसांना आदेश दिले आहे. राष्ट्रीय बाल आयोगाच्या या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

नितेश यांचा टोला…

याचवरुन नितेश राणेंनी या आदेशाचं पत्रक ट्वीट करत आदित्य यांना लक्ष्य केलंय. “राष्ट्रीय बाल हक्क आयोग अशाप्रकारे जी व्यक्ती स्वत: एक लहान मुल आहे तिला नोटीस कसं काय पाठवू शकतं, हा अन्याय मान्य नाही,” असं उपरोधिक ट्विट नितेश यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी इमोजी वापरुन शेवटी, “बच्चे की जान लोगे क्या” असा टोलाही लगावलाय.