मुलाखत द्यायची तर पब्लिकमध्ये यावं, बंद खोलीतून काय आरोप करता? – रावसाहेब दानवे 

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतरच्या ह्या पहिल्याच जाहीर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपावरही टीका केली आहे.

ठाकरेंनी विरोधकांवर टीका केल्यानंतर आता विरोधकांनी देखील जोरदार पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. त्यांना मुलाखत द्यायचीच असेल तर पब्लिकमध्ये येऊन द्यावी. लोकांमध्ये उतरून त्यांनी ही मतं मांडून दाखवावीत. बंद खोलीतून काय आरोप करता, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केलाय. TV9 मराठीशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिले आहे.

त्यांचेच प्रश्न, त्यांचीच उत्तरं, ही सगळी मॅच फिक्सिंग (Match fixing) असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच राऊतांना मुलाखत घ्यायचीच असेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरेंची (Devendra Fadnavis, Eknath Shinde, Raj Thackeray) घेऊन दाखवावी, असंही दानवे म्हणाले. बंद खोलीत मुलाखत घेऊन काहीही बिनबुडाचे आरोप केले आहेत. शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणतात, 2019 मध्ये त्यांनी दगाफटका केला नाही? शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन, असं आश्वासन त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) दिलं होतं. मग एकनाथ शिंदेंना हे पद का दिलं नाही. स्वार्थापोटी त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केले आहेत… असं रावसाहेब दानवे म्हणाले.