रविंद्र जडेजाची पत्नी राजकारणाच्या मैदानात, गुजरात निवडणुकांसाठी भाजपाने दिली उमेदवारी

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या २७ वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजप हा अजिंक्य गड गमावण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे उमेदवारांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करत आहे. अशात आता भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा सोलंकी यांना राजकीय मैदानावर उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाने त्यांना जामनगर उत्तरमधून उमेदवारी दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या पत्नीला भाजपने उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यांची बहीण नयनाही काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जडेजाची पत्नी रिवाबा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काही काळानंतर त्यांची बहीण काँग्रेसमध्ये दाखल झाली. पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष केले. ती राजकारणात खूप सक्रिय आहे.

कोण आहे रिवाबा सोलंकी?
रिवाबा मूळची राजकोट, गुजरातची आहे. त्यांचे वडील व्यापारी आहेत. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्या दीर्घकाळापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. २०१६ मध्ये त्यांनी रवींद्र जडेजासोबत लग्न केले. भाजपमध्ये येण्यापूर्वी रिवाबा राजपूत समाजाच्या करणी सेनेच्या सदस्य होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये स्टेजवर दिसत होते.