RBI ने रद्द केला ‘या’ बँकेचा परवाना, जाणून घ्या ग्राहकांचे पैसे कसे मिळणार?

नवी दिल्ली-  RBI ने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कानपूरस्थित पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. मध्यवर्ती बँकेने सांगितले की या बँकेला भांडवलाची कमतरता आहे आणि उत्पन्नाची कोणतीही शक्यता नाही, त्यामुळे तिचा परवाना रद्द करण्यात येत आहे.

सोमवारी एका निवेदनात या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याबाबत माहिती देताना रिझर्व्ह बँकेने माहिती दिली , रिझर्व्ह बँकेने उत्तर प्रदेशातील सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश जारी करण्यास सांगितले आहे.  यासोबतच बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

प्रत्येक ठेवीदार बँक बंद  झाल्यास ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळ (DICGC) कडून रु. 5 लाखांपर्यंतच्या ठेव विम्याचा दावा करू शकेल. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या 99 टक्के ठेवीदारांना त्यांची संपूर्ण ठेव रक्कम DICGC कडून विमा म्हणून मिळण्याचा हक्क असेल.

आरबीआयने म्हटले आहे की पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाच्या शक्यता नाहीत. याशिवाय बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या अटींचे पालन करण्यातही ही बँक अपयशी ठरली आहे. परवाना रद्द झाल्यास ही बँक कोणत्याही प्रकारचे बँकिंग काम करू शकणार नाही.